# Happy mathematics day "The Man who knew Infinity " .
एकदा अंकगणिताच्या तासाला शिक्षक वर्गात ‘भागाकार’ शिकवत होते. उदा. फळयावर त्यांनी तीन केळय़ांची चित्र काढून प्रश्न विचारला, ‘तीन केळी तीन मुलांना वाटायची झाल्यास, प्रत्येकास किती केळी मिळतील?’ एकाने उत्तर दिले ‘एक’ शिक्षकाने त्यास शाबासकी देऊन दुसरा प्रश्न विचारला.आता १००० केळी व १००० मुले असल्यास प्रत्येकास किती केळी मिळतील? त्यावर कोप-यातील श्रीने हात वर करून विचारले, ‘सर, कोणालाच केळी वाटली नाही, तर प्रत्येकास एक केळे मिळेल का?’ या विचित्र प्रश्नाने वर्गात सारे खोखो हसू लागले. इतरांना तर वाटले, सर आता चिडून श्रीला मारतील.पण तसे काही घडले नाही. त्याऐवजी सर उलट इतरांना म्हणाले, ‘अरे यात हसण्यासारखे काय आहे? चूप बसा. त्याला काय म्हणायचंय ते समजून घ्या.’ आतापर्यंत दोन्ही उदाहरणात एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास ‘एक’ उत्तर मिळाले. पण श्रीला विचारायचंय, शून्य केळी शून्य मुलांना वाटल्यास प्रत्येकास एकच केळे मिळेल का?अर्थात ‘नाही’ प्रत्येकास ‘अनंत’ येईल. ही गणिती गंमत ऐकून वर्गात पुन्हा खसखस पिकली. शिक्षकाने मोठया मनाने श्रीला शाबासकी दिली आणि वर्गातील इतर मुलेही त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागली. ‘शून्याने शून्यास भागल्यावर उत्तर अनंत’ या भास्कराचार्याच्या शोधाचा सुमारे ७५० वर्षानी पुन्हा अनुभव देण्यासाठी जणू श्रीच जन्माला आला.पुढे त्याच्या जीवनात पुन्हा पुन्हा सिद्ध होत गेले की शिकायला तामीळनाडूत असो वा केंब्रिजमध्ये, त्याची गणितीबुद्धी गुरूच्याही पुढे सतत झेप घेत असे.बाराव्या वर्षापर्यंत ‘लोने’ची त्रिकोणसमिती श्रीने आत्मसात केली आणि त्यावर स्वतंत्र संशोधन सुरू केले. त्यानंतर पुस्तकाबाहेरचे कैक गणिती सिद्धांत मांडले. पुढे पंधराव्या वर्षी श्रीने उपयोजित गणितावरील जॉर्ज शुब्रिजकार यांचा एक लेख त्यांच्या वाचनात आल्यावर, त्यांच्या उपलब्ध पुस्तकांचा श्रीने वाचून फडशा पाडला. त्यातील प्रश्न सोडवून तो गणिताबाबत अधिकच जिज्ञासू बनला.नाना गणिती संकल्पना त्याच्या मनावर राज्य करू लागल्या. पाटी, वही वा कागदी कपटे यांच्यावर तो प्रश्नांची उत्तरे मांडू लागला. मॅट्रिकच्या परीक्षेत श्रीला प्रथमवर्ग व सुब्रह्मण्यम् शिष्यवृत्ती मिळाली. आता श्री चारचौघात आपले म्हणणे उत्तम इंग्रजीत मांडत असे. पुढे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात शिकताना गणित सोडून इंग्रजी, इतिहास व शरीरशास्त्र या विषयांमध्ये श्रीची दांडी उडाली.त्याच्या या अपयशाने पित्याला दु:ख झाले. त्याला गणितवेडातून बाहेर काढण्यासाठी आठ वर्षाच्या ‘जानकी’ नामक मुलीशी श्रीचा विवाह लावण्यात आला. त्यामुळे श्रीला पोटापाण्यासाठी नोकरी करणे भाग पडले. रस्त्यावरील रद्दी कागद तो वापरी. निळया शाईने लिहिलेल्या कागदावर लाल शाईने लिहून तो काटकसर करी.
आपल्या राहणीमानाकडे त्याचे तसे लक्ष नसे. तो तामिळनाडूच्या विविध कार्यालयात जाई. तेथे तो प्रमाणपत्रे दाखवण्याऐवजी आपल्या फाटक्या वहीतील गणिती अंकांची करामत दाखवी. पण त्यामुळे त्याला कोणी थारा देत नसे. अखेर मद्रास पोर्ट ट्रस्टचे संचालक फ्रान्सिस स्प्रिंग हे त्याच्या तळपत्या गणिती बुद्धीने मुग्ध झाले आणि दरमहा २५ रु. वेतनावर कारकून म्हणून नेमले.श्रीच्या गणिती बुद्धीचे संशोधन वृत्तीद्वारे चीज होण्यासाठी गणित शिक्षकांनी व शिक्षणतज्ज्ञांनी जीवाचे रान केले. अखेर १ मे १९१३ रोजी गाठीशी कुठलीही पदवी नसलेल्या श्रींना मद्रास विद्यापीठाचे दोन वर्षासाठी मासिक ७५ रु. शिष्यवृत्ती दिली. नोकरीतून दोन वर्षाची बिनपगारी रजा मिळाली.श्रीच्या गणिती बुद्धीचा इंग्लंडला उपयोग होईल हे जाणून लॉर्ड पेंटल डे यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर केला. विद्यापीठाच्या व्याख्याता निधीकडून मोठी शिष्यवृत्ती त्यास मिळवून दिली. अखेरीस श्री एक सन्माननीय व्यक्ती ‘श्रीयुत रामानुजन’ म्हणून नेव्हासा जहाजाने १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला निघाला.१४ एप्रिल १९१४ ला तेथे पोहोचल्यावर केंब्रिज ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्रा. ई. एच. नेव्हिले यांनी रामानुजन यांचे स्वागत केले. मार्च २०१६ मध्ये गणिती संशोधनाद्वारे रामानुजन बी.ए. झाले. फ्रान्सिस स्प्रिंग यांच्या भलावणीमुळे १९१८ पर्यंत विद्यापीठाने शिष्यवृत्ती २५० पर्यंत केली.तेथील ज्येष्ठ गणिती जी. एच. हार्डी यांना १२० समीकरणे असलेले पत्र रामानुजन यांनी पूर्वीच पाठवले होते. त्यात अविभाज्य संख्या, अतिगुणोत्तरीय मालिका, मॉडय़ुलर फंक्शन, इव्हन मॅजिक स्क्वेअर्स, लंबगोलीय भूमिती, रेईमन सारणी, हायपरजॉमेट्रिक सारणी यांचा समावेश होता. त्यावरून हार्डी व त्यांचे सहकारी लिटीलवूड यांना रामानुजन हे ज्येष्ठ गणिती असल्याशिवाय ते असे प्रश्न विचारू शकणार नाहीत, हे कळून चुकले.
त्या विद्यापीठात असताना रामानुजन यांनी त्यांच्याबरोबर पूर्णाक, संयुक्त संख्या, निरंतर अपूर्णाक यांविषयी केलेले काम जगन्मान्य झाले.कडाक्याच्या थंडीला रामानुजन यांचा शाकाहार रोखू शकत नव्हता. ते क्षयाने ग्रासले. त्याकाळी त्यावर उपाय नव्हता. ते थकत, खंगत गेले. चर्या मलूल पडली. मरणोन्मुख असतानाही त्यांची गणिते चालूच होती. भारतात परतल्यावर तामिळनाडूतील ‘चेटपेट’ या ठिकाणी २६ एप्रिल १९२० रोजी त्यांचे देहावसान झाले.रामानुजन यांना गणिताबरोबर फलज्योतिषाचेही वेड होते. ‘जादूचा चौरस’ हा रामानुजन यांचा आवडता उद्योग. जन्मदिनांक, महिना व वर्ष यांचा उल्लेख आहे. प्रत्येक रांगेतील अंकांची उभी, आडवी वा कर्णाच्या दिशेने येणारी बेरीज १३९ होते.
२२ १२ १८ ८७
२१ ८४ ३२ ०२
९२ १६ ०७ २४
०४ २७ ८२ २६
रामानुजन आजारी असताना प्रा. हार्डी हे इंग्लंडच्या ‘पुतनी रुग्णालयात’ भेटण्यास गेले व म्हणाले, ‘मी १७२९ क्रमांकाच्या टॅक्सीने आलो. हा अंक अशुभ आहे कारण त्यास तेरा या अशुभ अंकाने भाग जातो.’ त्यावर रामानुजन म्हणाले, ‘हा फार रंजक व महत्त्वपूर्ण आकडा आहे. हा अंक दोन घनांची बेरीज दोन प्रकारे करून येणारा सर्वात लहान अंक आहे.’
(१०)३ + (९)३ = १००० + ७२९ = १७२९
(१२)३ + (१)३ = १७२८ + १ = १७२९
तेव्हापासून सारे जग १७२९ ला ‘रामानुजन अंक’ म्हणून ओळखू लागले.
Comments
Post a Comment
If you have any doubt, please let me know.